राष्ट्रपती राजवटीची चर्चा निव्वळ पोटदुखी, ‘मातोश्री’वर पवार-ठाकरेंची दीड तास चर्चा, पण… : संजय राऊत

0
367

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मातोश्री वर गेले होते. दोघा नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली, असे माध्ममांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मात्र सरकार मजबूत असल्याची ग्वाहीसुद्धा राऊतांनी यावेळी दिली.

“शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील, तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. ‘कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका भाजप नेते वारंवार करत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कालच राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे.

शरद पवार यांनी लॉकडाऊन उठवून अर्थचक्र सुरु करण्यासाठी साखर उद्योग, कृषी उद्योगाला चालना देण्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत तात्काळ लॉकडाऊन उठवला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेसाठी पवार ‘मातोश्री’ची पायरी चढले असावेत, असाही कयास व्यक्त केला जात आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील खदखद व्यक्त होत असल्याची चर्चा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला देणं किंवा महाविकास आघाडी तोडण्याची हीच वेळ असल्याचं सुचवणे, हे याचेच द्योतक मानले जाते.