राष्ट्रपतींनी राज्याचा कारभार हाती घ्यावा, अशी शिफारस राज्यपाल करणार ?

0
297

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : आघाडी सरकार विरुध्द राज्यपाल असा वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विधान परिषद सदस्य नियुक्ती नंतर कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावर आणि आता मंदिरे उघडण्यावर हा संघर्ष दिसून आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बंद मंदिरावरुन लिहिलेलं पत्र आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं उत्तर यामुळे चांगलाच वाद रंगला आहे. आता राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार वाद राष्ट्रपती दरबारी जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रपतींनी राज्याचा कारभार हातील घ्यावा अशी शिफारस राज्यपाल करु शकतात.

राज्यपालांना घटनात्मक अधिकार आहेत की ते मुख्यमंत्र्यांकडे उत्तरं मागू शकतात, ज्याची समाधानकारक उत्तरं देणं मुख्यमंत्र्यांना भाग असतं. राज्यपाल राष्ट्रपतींना सांगू शकतात की राज्याशी संबंधित प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने राज्यातील राजकीय परिस्थिती आलबेल नाही. त्यामुळे राष्ट्रपतींनी राज्याचा कारभार हाती घ्यावा, अशी शिफारस राज्यपाल करु शकतात.

दर महिन्याला राज्याच्या परिस्थितीचा अहवाल राज्यपाल राष्ट्रपती कार्यालयाला पाठवतात. बंद मंदिरांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन चांगला वाद रंगला आहे. त्यामुळे या सामन्यामुळे राज्यातल्या सद्य परिस्थितीबाबत राज्यपाल कोश्यारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अहवाल पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावरही भाजपच्या गोटातून शंका उपस्थित केली जात आहे. कारण पवार खरंच याबाबतीत गंभीर असते तर त्यांनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहून चिंता व्यक्त करायला हवी होती असं जाणकारांचं मत आहे.

दरम्यान, राज्यपाल यांच्या भुमिकेवर कठोर शब्दांत खुद्द शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दुगान्या झाडल्याने आता आघाडी सरकारची परिक्षा आहे. राज्यपाल या निमित्ताने महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे. त्यातून राजकीय संघर्ष अधिक वाढणार असेही सांगण्यात येते.