रावेत येथील हॉटेल शिवनेरीच्या मॅनेजर खूनप्रकरणी फरार आरोपीस दिघीतून अटक

0
3392

भोसरी, दि. १५ (पीसीबी) –  रावेत येथील हॉटेल शिवनेरीमध्ये बिलाच्या वादातून मॅनेजर विनायक दत्तोबा शिंदे (वय ३५) याचा गोळ्या घालून खून केल्या प्रकरणी फरार आरोपी तुषार जोगदंड याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१४) दिघीतील रोडे हॉस्पिटलजवळ गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केली.

याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी यापूर्वीच माजी नगरसेवक जालिंदर किसन शिंदे, कुनाल दशरथ लांडगे, नरेंद्र सुभाष भोईर, विशाल वसंतराव टिंगरे, साई उर्फ कौशल रामचंद्र विश्वकर्मा, बापु उर्फ प्रदिप दत्तात्रय गाढवे, संतोष उर्फ रुपेश सुरेश पाटील, राहुल मोहन करंजकर यांना अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखा युनिट १ चे पथक दिघी पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चेक करत असता पोलीस नाईक सचिन अहिवळे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, देहुरोड पोलीस ठाणे हद्दीत खुन करु चार वर्षांपासून फरार झालेला आरोपी तुषार जोगदंड हा दिघी येथील रोडे हॉस्पिटल शेजारी असलेल्या त्याच्या घरी येणार आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून तुषार याला अटक केली. तसेच देहुरोड पोलीस ठाण्यास संपर्क करुन गुन्ह्याबाबत खात्री केली असता आरोपी तुषार हा रावेत येथील हॉटेल शिवनेरीचे मॅनेजर विनायक शिंदे यांच्या खून प्रकरणी २०१४ पासून फरार असल्याचे समजले. यामुळे पोलिसांनी तुषार याला देहुरोड पोलीसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक सचिन अहिवळे, सचिन उगले, प्रविण पाटील आणि गणेश सावंत यांच्या पथकाने केली.