रावेत बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
996

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – रावेत येथील पवना नदीच्या बंधाऱ्या एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

मंगला अशोक शिंदे (वय ५५, रा, धर्मराज मंदिराजवळ, रावेत) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास रावेत येथील पवना नदीच्या बंधाऱ्यात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना काही स्थानिकांना आढळला. त्यांनी वाकड पोलिसांना या बाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मंगला यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. आणि दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यातूनच त्यांनी पवना नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.