Chinchwad

रावेतमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी फोडले चार फ्लॅट; १५ लाखांचा ऐवज केला लंपास

By PCB Author

May 08, 2019

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – रावेत येथील शंकेश्वर सोसायटीमध्ये मंगळवारी (दि.७) पहाटे तीन ते साडे तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी तब्बल चार फ्लॅट फोडले. या घटनेत चोरट्यांनी तब्बल १५ लाखांचा ऐवज लंपास केला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.७) पहाटे तीन ते साडे तीनच्या सुमारास रावेत येथील शंकेश्वर सोसायटीमध्ये सशस्त्र दरोडेखोर घुसले. या चोरट्यांकडे तलवारी, कोयते आणि कटवणी होती. त्यांनी कटवणीच्या सहाय्याने जे लॉक उघडले जात होते, असे चार फ्लॅटचे लॉक तोडले आणि त्यातील तब्बल पंधरा लाखांचा ऐवज चोरुन नेला. फ्लॅटमध्ये चोरी होत असताना आजुबाजुच्या लोकांना हे समजले होते. मात्र सशस्त्र दरोडेखोरांच्या भितीने कोणीही त्यांना आढवले नाही. चोरट्यांनी चोरी झाल्यानंतर सोसायटीतील सीसीटीव्ही देखील फोडले. मात्र तरीसुध्दा ते काही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. देहुरोड पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.