Maharashtra

रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट; काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी १६ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक

By PCB Author

August 18, 2019

औरंगाबाद, दि. १८ (पीसीबी) – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी १६ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही रांग लावून उभे आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाण्यात झालेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाच्या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमा दरम्यानच काँग्रेसच्या सरसाबाई वाघ यांच्यासह औरंगाबाद तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ पैकी काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणखी १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांग लावून उभे आहेत. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचार घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पक्षात इनकमिंग होत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कुणी आले तरी आपले काम सुरूच ठेवायचे असते. एकनाएक दिवस तुम्हाला नक्कीच न्याय मिळतो, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.