‘रायुडू… बेटा, निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा ये, धोनीसारखी घाण कायम राहत नाही’, योगराज सिंह यांची धोनीवर टीका

0
582

चंदिगढ, दि. १० (पीसीबी) –  युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर शरसंधान केले आहे. रायुडूला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन करताना योगराज यांनी धोनीबाबत ‘घाण’ अशा शब्दाचा प्रयोग केला आहे.

योगराज यांनी म्हटले आहे की, ‘रायुडू, मुला, तू घाईत निर्णय घेतलास. निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा ये आणि त्या लोकांना सांग तू कोण आहेस ते’. ‘धोनीसारखी माणसे नेहमीसाठी राहत नाहीत, अशी घाण कायम राहत नाही’, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. विश्वचषकासाठी रायुडूचा संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. तो रिझर्व्ह खेळाडूंमध्ये सहभागी होता. शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाल्यानंतर त्याचा समावेश न करता ऋषभ पंत आणि रिझर्व्ह खेळाडूंमध्ये समावेश नसलेल्या मंयक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले.

यावर योगराज यांनी प्रतिक्रिया देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. याआधीही योगराज यांनी महेंद्रसिंह धोनीवर अनेकदा टीका केली आहे. योगराज यांनी धोनीची तुलना रावणाशी केली होती. तसेच धोनीमुळेच युवराज टीमबाहेर गेला. धोनी युवराजला पसंत करायचा नाही, असे आरोप केले होते.

युवराजच्या निवृत्तीनंतरही योगराज यांनी धोनीवर टीका केली होती. भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंना योग्य पद्धतीने निरोप दिला गेला नाही. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत जे घडले तेच आता युवराजसोबत घडले आहे. व्ही.व्ही.एस.लक्ष्मण सारख्या महान खेळाडूलाही अशाच पद्धतीने निवृत्ती स्विकारावी लागली. यासाठी केवळ एकमेव माणूस जबाबदार आहे, असे नाव न घेता योगराज यांनी धोनीला आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले होते.