रायगडावरील मेघडंबरीतील फोटोप्रकरणी रितेश देशमुखने मागितली माफी

0
422

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख याच्यावर शिवप्रेमीतून टीका होऊ लागल्या आहेत. त्यानंतर रितेश देशमुखने माफीनामा सादर करून माफी मागितली आहे.

अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, पानिपतकार विश्वास पाटील आणि त्यांचे सहकारी ५ जुलैरोजी रायगडवर गेले होते. तिथे त्यांनी राजदरबारातील मेघडंबरीत चढून फोटो काढून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यावर रितेशवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली होती.

यावर रितेश यांने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मीही येथील वातावरणामुळे भारावून गेलो होतो. महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. आजन्म ज्यांच्या पायावर डोके ठेवून कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षापासून होती.

तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेऊन ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे केवळ भक्तीभाव होता. ती छायाचित्रे घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावले असेल, तर त्याची आम्ही अंतपूर्वक माफी मागतो.