राम मंदिर निर्मितीच्या अध्यादेशाची मागणी अयोग्य-आठवले

0
455

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – निवडणुका जवळ आल्या आहेत आणि सध्या देशात राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अशात राम मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने अध्यादेश काढावा अशीही मागणी होते आहे. मात्र केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही मागणी योग्य नसल्याचे म्हटले आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधव आपल्या देशात गुण्यागोविंदाने वास्तव्य करत आहेत. त्यांच्यात कोणतीही फूट पडावी असे मला वाटत नाही, असेही आठवले यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राम मंदिराच्या निर्मितीसंदर्भात अध्यादेश काढण्याची मागणी अयोग्य आहे. राम मंदिरासंदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर बाबरी मशिदीचे काय? त्याबद्दलचाही निर्णय झाला पाहिजे असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टात आहे. याप्रकरणी जानेवारी महिन्यात सुनावणी करू असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिल्यापासून राम मंदिराच्या निर्मितीवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेनेने राम मंदिरासंदर्भातला अध्यादेश काढा असे म्हटले आहे. तसेच इतर काही धार्मिक संघटनांकडूनही अशाप्रकारची मागणी होताना दिसते आहे. अध्यादेश काढला जाणार की नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलेले नाही. मात्र राम मंदिराच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आजच सामनाच्या अग्रलेखात राम मंदिराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जावा अशी मागणी शिवसेनेने केली. असे असले तरीही केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मात्र अध्यादेशाची मागणी चुकीची असल्याचे म्हटले आहे.