राम मंदिर चिंतनाचा नाही तर कृतीचा विषय; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

0
607

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरुन सामना संपादकीयच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? राजनाथ म्हणतात, ‘संयम.’ गडकरी म्हणतात, ‘सहमती’ व सरसंघचालक सांगतात, ‘रामाचीही वेळ येईल.’ पंचवीस वर्षे राम उघडय़ा तंबूत व आपण सारे सत्तेच्या खुर्च्या उबवत आहोत. पुन्हा राममंदिरावर कोणी काही बोलायचे नाही. राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी पाडली त्यांच्यावरचे खटलेही तुम्ही काढू शकत नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या! असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा? असे विचारले जात आहे व भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही. संसदीय पक्षाच्या बैठकीत काही खासदारांनी पुन्हा राममंदिराचा प्रश्न विचारला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘मंदिरप्रश्नी संयम राखा, योग्य वेळी सर्वकाही होईल’ असे उत्तर दिले. याच वेळी नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे. ‘एकमेकांच्या सहमतीने आणि सहकार्याने अयोध्येत राममंदिर उभारावे.’ भाजप अंतर्गत राममंदिरप्रश्नी अस्वस्थता निर्माण झाली आहे व राज्य चालवणाऱ्यांकडे कोणतीही ठोस योजना नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

आम्ही अयोध्या दौरा केला व राममंदिराचा विषय पुन्हा राष्ट्रीय पातळीवर आणला. आम्ही अयोध्येत जाऊन हे केले नसते तर मंदिर विषय पुन्हा शरयूच्या गाळातच रुतला असता व मतांसाठी पुन्हा त्याच नदीत डुबक्या मारण्याचे प्रयोग सुरू झाले असते. या जुमलेबाजीस आम्ही अयोध्येत जाऊन लगाम घातला. त्यामुळे भाजपअंतर्गत या प्रश्नी निदान थातूरमातूर चर्चा तरी सुरू झाली असं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

भाजपप्रणीत हिंदुत्ववादी संस्था, संघटना जागोजाग धर्मसभा, संत संमेलने घेऊन राममंदिरावर ‘चिंतन’ करीत आहेत. आता हा चर्चा, चिंतन आणि संयमाचा विषय राहिला नसून ‘ऍक्शन’ म्हणजे कृतीचा विषय बनला आहे. राजनाथ सिंग म्हणतात, ‘संयम राखा’ व गडकरी सांगतात, ‘सहमतीने मंदिर बांधा.’ या दोन शब्दांनीच आतापर्यंत हिंदूंना *डू बनवले आहे असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.