राम मंदिर उभारण्याबाबत उध्दव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद – उमा भारती

0
534

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केल्याबद्दल भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी कौतुक केले आहे. राम मंदिर उभारण्याबाबत ठाकरे यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.  राम मंदिरावर भाजपचा पेटंट नाही. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि अकाली दलासह अन्य पक्षांनीही साथ द्यावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा अयोध्या दौरा केला होता. कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा आणि राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे आव्हान ठाकरे यांनी  मोदी सरकारला दिले होते. या पार्श्वभूमीवर उमा भारती या होशंगाबाद येथे प्रचारसभेसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचे कौतुक केले.

त्या म्हणाल्या की,  भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, अकाली दल, ओवेसी, आझम खान या सर्वांनीही पुढे येऊन राम मंदिराच्या उभारणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.