राम मंदिरासाठी कायदा करण्यात यावा – मोहन भागवत

348

नागपूर, दि. १८ (पीसीबी) – राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. राजकारणामुळे राम मंदिराचा मुद्दा लोंबकळत पडला आहे. राम जन्मभूमीवर तिथे मंदिर होते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आवश्यक कायदा करा आणि भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (गुरूवार) येथे  केले.

दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजया दशमी दसरा साजरा केला. स्वयंसेवकांनी पथसंचलन केल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी मोहन भागवत म्हणाले की,  रामजन्मभूमीवर लिहिलेलेही आहे की तिथे मंदिर होते. त्यामुळे मंदिर असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, काही लोक निर्णय प्रक्रियेत विलंब करत आहेत. हे लोक धार्मिक राजकारण करत आहेत. त्यामुळे सरकारने आवश्यक कायदा करुन राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा, असे  भागवत यांनी आवाहन केले. प्रभू राम हे केवळ हिंदूंसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे, असे भागवत  म्हणाले

भारत शांतता व अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश आहे. हिंसेने केवळ नुकसानच होते. गेल्या काही वर्षांत भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यामुळे भारत निश्चितच विश्वगुरु होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत इतका बलवान बनावा की आक्रमण करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, असेही ते म्हणाले.