Maharashtra

राम मंदिराबाबत केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलावे- उद्धव ठाकरे

By PCB Author

September 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – “राम मंदिराबात केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलावे” असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरासाठी आग्रही आहोत. कोर्टात अंतिम सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्ट योग्यच निर्णय घेईल मात्र केंद्र सरकारने योग्य पावले उचलावीत”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अयोध्या येथील बाबरी आणि राम मंदिर प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे. त्यासंदर्भातच उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली.

“काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द करण्याबाबत जसा धाडसी निर्णय सरकारने घेतला अगदी तसाच धाडसी निर्णय राम मंदिराच्या निर्मितीबाबत  मोदी सरकारने घेतला पाहिजे. राम मंदिराबाबत विशेष कायदा करुन सरकारने हा निर्णय घ्यावा. आता आणखी वेळ घालवू नये आम्ही खूप वेळ वाट पाहिली आहे” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आरेबाबतही या पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. नाणारचे जे झाले तेच आरेचे होईल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात आरेतील मेट्रो कारशेडवरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद जुंपण्याची चिन्हे आहेत.