राम मंदिराबाबत उध्दव ठाकरेंची राजकीय खेळी; महंत नरेंद्र गिरींनी धुडकावले शिवसेनेचे आमंत्रण     

0
728

अलाहाबाद, दि. २१ (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या अयोध्या दौऱ्याचे  अखिल भारतीय आखाडा परिषदेने आमंत्रण  धुडकावून लावले आहे. तसेच उद्धव ठाकरे  राजकीय खेळी करत आहेत, असा गंभीर आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी केला आहे. त्याचबरोबर आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर २५ नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत, असेही नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले आहे.

या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना केवळ प्रचार करण्यासाठी आणि राजकारणासाठी अयोध्यात कार्यक्रम करत आहेत, असा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला आहे. जर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्वादी पक्षांचा मंदिर बनवणे हाच हेतू असेल, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन का? असा सवालही नरेंद्र गिरी यांनी केला आहे.  शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांमुळे मंदिर बांधण्याबाबत कोणताही तोडगा निघणार नसल्याचे गिरी  यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आखाडा परिषदेने ४ आणि ५ डिसेंबर रोजी अयोध्येत स्वतंत्र  बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांसह अनके मुस्लीम धर्मगुरुंना आमंत्रण देण्यात आले आहे. जर राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले, तर परस्पर सहमतीने काहीतरी तोडगा नक्कीच निघेल, असे गिरी यांनी म्हटले आहे.