‘राम’ नव्हे  ‘रावण’ , राम कदम यांच्यावर मनसेचा ‘पोस्टर वार’

0
911

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेने बॅनरबाजी केली. घाटकोपरमध्ये तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर मनसेने बॅनर लावले. हे बॅनर पहाटे पोलिसांनी काढले असून घाटकोपरमधील बॅनरबाजी प्रकरणी पोलिसांना एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांचे हे विधान वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर प्रसारित होताच त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राम कदम यांच्यावर टीका केली आहे. तर मनसेने बॅनरबाजी करत राम कदम यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. मनसेने घाटकोपरमध्ये आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॅनर लावले.

‘वाह रे भाजपा सरकार, वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार, मतदारांनो आपल्या मुलीला सांभाळा. स्वयंघोषित दयावान आणि डॅशिंग भाजपा आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहेत. जर आमदार किंवा त्यांच्या समर्थकांनी असे केले तर पोलिसांकडे तक्रार करा आणि आम्हालाही कळवा’, असे या बॅनरवर म्हटले आहे.