राम कदमांविषयी प्रश्न करतील म्हणून चंद्रकांत पाटलांनी टोलवसुलीवर बोलणे टाळले   

0
664

लोणावळा, दि. १२ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यास राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून नकार दिला आहे. यावर राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की, तुम्ही नंतर राम कदमांचा प्रश्न विचाराल, असे सांगून त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

आज (बुधवार) लोणावळ्यात विविध विकासकामांचे भूमीपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील  टोल वसुलीबाबत प्रश्न विचारला असता. पाटील टोल वसुलीवर काहीही बोलले नाहीच, मात्र,  राम कदम यांचा प्रश्न विचाराल असे म्हणत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.

दरम्यान, बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांची चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली होती. राम कदमांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यामुळे आता पुन्हा राम कदम यांचा विषय येऊ नये, यासाठी चंद्रकांत पाटलांनी टोल वसुलीवरही बोलण्यास नकार दिला असावा, असे बोलले जात आहे.