रामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदार जयकुमार गोरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

0
804

सातारा, दि. ४ (पीसीबी) – पनवेल येथील जमीनप्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी  मागणी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच फलटण शहर, लोणंद, सातारा अधीक्षक कार्यालय आणि पनवेल पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीची चौकशी करण्याची मागणीही केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोरे बोलत होते.

यावेळी गोरे म्हणाले की, राजकारणातील  सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना लक्ष्य केले जात आहे. सत्तेचा गैरवापर करून त्यांचे सामाजिक व राजकीय जीवन संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सागर अभंग, श्रीकृष्ण गोसावी आणि अन्य दोन सहकाऱ्यांनी पनवेल येथील जमिनीचा व्यवहार केला.

या व्यवहारातून दूर होण्यासाठी अभंग यांना रामराजेंकडून दमदाटी  करण्यात आली .  याबाबत अभंग यांनी फलटण पोलिसात तक्रार दिली होती.  दरम्यान, सहायक फौजदार भोईटे यांनी अभंग यांना तक्रार मागे घेण्यास सांगून त्यांना रामराजेंच्या घरी नेण्यात आले. तेथे रामराजेंनी त्यांना दमदाटी करत तु फलटणचा आहेस,  आमदार जयकुमार गोरेंच्या नादाला लागू नको. फलटण जवळ की दहिवडी जवळ, असे धमकावत   पनवेलच्या जमिनीची सर्व कागदपत्रे आणून देण्यास सांगितले, असे गोरे यांनी सांगितले.

गोरे पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून सत्ता आणि पोलिस यंत्रणेचा वापर करून विरोधकांना संपविले जात आहे. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्र्यांना दिली आहे. एका मोठ्या व्यक्तीने अशा प्रकारे वर्तणूक करणे, दमदाटी करणे योग्य आहे का? असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे.