राममंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना–भाजपची युती होईल – अजित पवार  

0
494

जळगाव,  दि. १९ (पीसीबी) –  शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढले, तर त्यांना फटका बसेल. त्यामुळेच अखेरच्या क्षणी राम मंदिराच्या मुद्द्यावर आमचे  एक मत झाले आहे, असे सांगून हे दोन्ही पक्ष  युती करतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  आज (शनिवार) येथे केला आहे.

जळगांवमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत पवार  बोलत होते.

आघाडी सरकारच्या काळात अधिकारी बिनधास्तपणे काम करत होते. मात्र, भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात नेत्यांच्या दबावाखाली अधिकारी काम करतात. उच्च शिक्षित व इंजिनीअर झालेल्या युवकांना पकोडे तर युवतींना चहाची दुकान लावून आपला उदनिर्वाह करण्याची वेळ युती सरकारनी आणली आहे, अशी जोरदार टीका त्यांनी  केली.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत असलेली मोदी लाट आता ओसरली आहे. जनतेच्या मनात आता सरकार विषयी नाराजी  पसरली आहे. या सरकारने फक्त आश्वासने  देण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकसभेच्या ४८पैकी ४४ जागांवर एकमत झाले आहे. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकरांसह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा विचार सुरु असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत समाजातील नावाजलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच प्रसिध्द वकील उज्वल निकम यांचे नाव समोर आले आहे. निवडणूक लढवण्याबाबतीत उज्ज्वल निकम यांनी अद्याप होकार दिलेला नाही. तसेच नकारही दिलेला नाही, असे  अजित पवार म्हणाले.