Desh

राममंदिराची उभारणी तातडीने होण्यासाठी संवाद आवश्यक – मोहन भागवत

By PCB Author

September 20, 2018

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) अयोध्येत राममंदिराची उभारणी लवकरात लवकर होण्यासाठी या प्रश्नावर संवाद होणे आवश्यक आहे. मात्र, मंदिरासाठी चळवळ उभारणाऱ्या राम मंदिर समितीचा अंतिम निर्णय असेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. तऱ मंदिर उभारणीसाठी वटहुकूम काढणार का? यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.   

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय परिषदेच्या समारोपाच्या दिवशी राममंदिरासह धर्मांतर, गोरक्षण, आंतरजातीय विवाह, शैक्षणिक धोरण आदी विविध मुद्द्यांवर भागवत यांनी ऊहापोह केला. ‘भविष्यातील भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर ही परिषद झाली.

भागवत पुढे म्हणाले की, लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी धोरण आखण्याची गरज असून या धोरणात सर्वांना सामावून घ्यावे. मुलांना वाढवण्यासाठी पुरेसे स्रोत नसलेल्यांपासून’ त्याची सुरुवात करावी, असेही ते म्हणाले. सध्याच्या आरक्षणाला पाठिंबा देतानाच आरक्षणाचे राजकारण करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. धर्मांतराला विरोध करून वेगळ्याच हेतूने आणि लोकसंख्येचे संतुलन बिघडवण्यासाठी धर्मांतराचा वापर केला जात आहे, असे सांगून   आंतरजातीय विवाहांना संघाचा विरोध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व हे इतरांना सोबत घेऊन चालते. भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे, अशी संघाची धारणा आहे, असेही भागवत यावेळी म्हणाले.