Chinchwad

रामनगरमध्ये पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून टोळक्यांकडून तिघा भावांना कोयता, गट्टू आणि दांडक्याने जबर मारहाण

By PCB Author

July 07, 2019

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी घरात घुसून तिघा भावांना कोयता, गट्टू आणि दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजवत धुडघूस घातला. ही धक्कादायक घटना शुक्रवार (दि.६) रात्री सव्वानऊच्या सुमारास सदगुरु व्हिला रामनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी सचिन अंकुश कुसाळकर (वय ३८, रा. रामनगर, सदगुरु व्हिला रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कृष्णा देवकर, पवन लष्करे आणि त्यांचे ७ ते ८ अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरुन फिर्यादी सचिन कुसाळकर यांचा आरोपी पवन आणि कृष्णा सोबत वाद झाला होता. यामुळे सचिनने त्या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यामुळे रात्री सव्वानऊच्या सुमारास त्या दोघांनी ७ ते ८ साथीदारांसोबत मिळून सचिन च्या घरावर हल्ला केला. तसेच सचिन, नविन भोसले आणि राहुल वेताळे या तिघा मावस भावांना कोयता, सिमेंटचे गट्टू आणि दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी पसार झाले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनसार शेख तपास करत आहेत.