राफेल व्यवहाराशी मोदींचा वैयक्तिक संबंध नाही;शरद पवारांकडून पाठराखण

0
572

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राफेल विमान खरेदी व्यवहाराशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संबंध नाही. मात्र, याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी होण्यास काही हरकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान,काँग्रेसकडून मोदींची चोर अशी संभावना केली जात असताना पवारांनी मोदींची पाठराखण केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   

राफेल व्यवहारात मोदींच्या हेतूबद्दल लोकांच्या मनात संशय नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या मुद्यावरुन भाजपच्या विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी आवाज उठवला असताना  पवारही मोदींना अडचणीत आणतील, असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी एकप्रकारे मोदींची पाठराखण केली आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान,  या विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची मागणी योग्य नाही. मात्र,  किंमती सरकारने जाहीर केल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने संयुक्त संसदीय चौकशी समितीची मागणी केली आहे. त्यामुळे आता संयुक्त संसदीय समितीची मागणी मान्य केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.