Desh

राफेल प्रकरणात मोदींना तुरूंगात जावे लागणार – राहुल गांधी

By PCB Author

February 12, 2019

नवी दिल्ली,  दि. १२ (पीसीबी) –  राफेल करारावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.   राफेल करारामध्ये एक ई-मेल समोर आला आहे. या ई-मेलनुसार परराष्ट्र सचिव आणि एचएएलच्या आधी  उद्योगपती अनिल अंबानी यांना राफेल कराराबाबत माहिती होती, असा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी यावेळी केला.

ई-मेलची कॉपी  सादर करत राहुल गांधी म्हणाले की, आता हे प्रकरण केवळ भ्रष्टाचाराचेच नाही तर गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघनही आहे.  गोपनीय माहिती जाहीर केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर खटला चालायला हवा. यात कोणीही वाचू शकणार नाही. जे लोक यात सामील आहेत, त्या सर्वांना  तुरूंगामध्ये जावे लागेल. हे देशद्रोहाचे प्रकरण आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, कॅगने राफेल कराराशी संबंधित अहवाल सोमवारी राष्ट्रपती, अर्थ मंत्रालयाला पाठवल्यानंतर तो आता लोकसभा अध्यक्षा आणि राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवला जाईल. कॅगचा अहवाल आज संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे.