राफेलप्रकरणी मोदींची शरद पवारांकडून पाठराखण नाही; राष्ट्रवादीचा खुलासा

0
669

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल खरेदी व्यवहार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केलेली नाही. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आलेला आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तर पवार असे बोललेच नव्हते. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला  आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राफेलच्या गुणवत्तेवर शंका नसल्याचे म्हटले होते. संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी आणि किंमतीचा खुलासा करावा, अशी मागणी शरद पवारांनी केली होती. तांत्रिक माहिती देण्याचा आग्रह विरोधकांनी धरू नये, असेही ते म्हणाले होते.

राफेल कराराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. या करारात घोटाळा असून त्यास मोदीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शरद पवार यांनी या संदर्भात व्यक्तव्य करताना मोदींच्या हेतूबद्दल शंका घेतली जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. मात्र, या वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार तारीक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.