राफेलप्रकरणी भाजप देशभरात ७० पत्रकार परिषदा घेणार

0
509

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – राफेल विमान खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दिलासा मिळालेल्या भाजपने काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. राफेल प्रकरणी सत्य मांडण्यासाठी भाजप देशभरात ७० पत्रकार परिषदा घेणार आहे. राफेल प्रकरणी  भाजपने काँग्रेसला जोरकसपणे प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज (सोमवार)  संसदेत राफेलच्या मुद्द्यावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसेच राफेल विमानांच्या करारावर  पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनीही मौन सोडले आहे. रायबरेलीत बोलताना मोदींनी राफेल करारावरुन काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. खोटेपणा हाच काँग्रेसच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. आधी संरक्षण मंत्रालयावर अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेसचा आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास राहिलेला नाही, अशी टीका मोदी यांनी केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणात हस्तक्षेप करण्यास  नकार देत करारावर शंका उपस्थित करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेस मात्र या कराराची जेपीसी म्हणजे  संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी करण्याच्या मागणीवर ठाम आहे.