राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते नव्हे, तर पक्षविरोधी नेते – बाळासाहेब थोरात

0
467

अहमदनगर, दि. १७ (पीसीबी) –  राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वरमध्ये आयोजित आघाडीच्या उमेदवाराच्या ‘ विजय निर्धार सभे’त  थोरात यांनी विखे-पाटील यांच्यावर हल्ला चढवला.  

थोरात म्हणाले की, ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत. विधानसभेत भाषण झाले का विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात असायचे, असा आरोपही थोरातांनी विखे यांच्यावर  केला. विखे काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचे आव्हान देत आहेत, असेही थोरात यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.

शिर्डी विधानसभेतील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते. सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मतमतांतरे असतात. मात्र यावेळची निवडणूक विचारधारेची असून आपापसांतील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे थोरात म्हणाले.