Maharashtra

राधाकृष्ण विखे-पाटीलसह काँग्रेसचे काही आमदार गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश करणार ?

By PCB Author

June 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – बहुप्रतिक्षित राज्य मंत्रिमंडळाचा  विस्तार  अखेर १४ जूनरोजी होणार आहे. त्याआधी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील  यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार गुरुवारी (दि.१३) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता विस्तारात कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मंत्रिपद मिळण्यासाठी भाजपमधील अनेक इच्छुक आमदारांसह बाहेरून भाजपमध्ये प्रवेश करू इच्छुणाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी भेट घेतली.  राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसच्या काही आमदारांसह भाजपमध्ये  प्रवेश करणार आहेत. त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे.

तर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह  काँग्रेसमधील काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  त्यांना कसे सामावून घ्यायचे आणि काय देता येईल, याबद्दल  मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजन हेही उपस्थित होते.

दरम्यान, मंत्रिमंडळातील ८ जागा रिक्त आहेत. यापैकी शिवसेनेला किती मंत्रिपदे द्यायची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शिवसेनेच्या एका आमदाराचा  मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.