राधाकृष्ण विखे-पाटलांच्या पुत्रासाठी काँग्रेसला हवी अहमदनगर लोकसभेची जागा

0
1018

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत  आहेत. त्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितली आहे.  तर राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली आहे. त्याचबरोबर  राष्ट्रवादीने ५०-५० टक्के जागावाटपाची मागणी केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी   शनिवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे आदी नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होते.

भाजपकडून दिलीप गांधी सध्या अहमदनगरच्या खासदारपदी आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव रावळे यांचा २ लाख ९ हजार १२२ मताधिक्यांनी पराभव केला होता. बॉलिवूड अभिनेत्री दीपाली सय्यद यांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. मुंबईतील आणखी एका जागेची मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली. काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर मध्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने मागितल्याची माहिती आहे. याबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.