राणे, नांदगांवकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा; अॅट्रॉसिटीच्या खटल्यातील गुन्हा रद्द

0
598

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी अॅट्रॉसिटीच्या खटल्यात दाखल केलेली याचिका स्वीकारली. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचे अपहरण केल्याबद्दल दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयानेच रद्द केला आहे. त्यामुळे राणेंना दिलासा मिळाला आहे. एका प्रकरणात नारायण राणेंसह, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि राणेंचे निकटवर्तीय रवी शेंडगे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  

या प्रकरणात आता गुन्हा रद्द करण्यास आपली हरकत नाही, असे प्रतिज्ञापत्र वळवी यांच्याकडून सादर करण्यात आले. त्यानुसार  न्यायालयाने  हा गुन्हा रद्द केला. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खडंपीठापुढे सोमवारी यावर सुनावणी झाली.

नारायण राणे, बाळा नांदगावकर आणि नारायण राणेंचे निकटवर्तीय रवी शेंडगे यांना अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यातून दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २००२ मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचे अपहरण केल्याबद्दल या तिघांवर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावेळी नारायण राणे आणि बाळा नांदगावकर हे दोघेही शिवसेनेत होते.

२००२ मध्ये काँग्रेसचे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पाडण्यासाठी युती सरकारने प्रयत्न केला होता. यावेळी  राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचे अपहरण करुन त्यांना जबदस्तीने मातोश्री स्पोर्ट्स क्लबवर डांबून ठेवल्याचा आरोप या तिघांवर करण्यात आला होता.