Maharashtra

राज ठाकरे काय बोलणार? शुक्रवारी मुंबईत मनसेचा मेळावा    

By PCB Author

August 08, 2019

मुंबई, दि. ८ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीनंतर मनसेचा पहिला  मेळावा शुक्रवारी (दि. ९)   प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात  होत आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ते काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधात मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी  राज्यातील स्थानिक नेत्यांशी चर्चाही केली आहे.  यानंतर सर्वपक्षीय नेत्यांसोबत  पत्रकार परिषद घेऊन  ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.

दरम्यान, काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्याबद्दल राज ठाकरे यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उद्या होणाऱ्या  मेळाव्यात ते ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीतील पक्षाची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.