Maharashtra

राज ठाकरे आघाडीसोबत आले, तर फायदाच होईल- छगन भुजबळ

By PCB Author

January 31, 2019

पंढऱपूर, दि. ३१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा झाली आहे.  या आघाडीत मनसे आली तर आणखी मजबूत ही आघाडी होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आघाडीसोबत आले तर फायदाच होईल, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी  म्हटले आहे.

का वृत्तवाहिनीशी बोलताना भुजबळ म्हणाले की, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांच्याशी जागावाटपाबाबत काही चर्चा सुरु आहे की नाही याबद्दल आपल्याला माहिती नाही. मात्र राज ठाकरे सोबत आले, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्याचा नक्की फायदा होईल, असे ते म्हणाले.

आघाडीला आगामी निवडणुकीत एक-एक मताची गरज आहे. राज ठाकरे यांच्यामागे तर हजारो मते आहेत. तसेच राज ठाकरे मोदी सरकारच्या विरोधात असल्याने त्यांचा आघाडीला नक्की फायदाच होईल, असे सांगून भुजबळांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत  समर्थन  दर्शविले आहे.