राज ठाकरे अजित पवार भेट; तर्कवितर्कांना उधाण  

0
354

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर या भेटीत मनसेला आघाडीत सामील करून घेण्यासाठी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.    

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसेने सामील व्हावे,  असे  अजित पवार यांनी म्हटले होते.  त्यामुळे ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.  ठाकरे आणि पवार यांचे स्नेही विवेक जाधव यांच्या पुढाकाराने ही भेट जाधव यांच्या दादर येथील निवासस्थानी झाली. या  भेटीतील तपशील समोर आलेला नसला तरी, आघाडीत सामील होण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, मनसे ला महाआघाडीत सहभागी करून घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मनसेला महाआघाडीत स्थान नसेल, असे स्पष्ट केले आहे.  मात्र, अजित पवार व राज यांच्या भेटीमुळे नवी राजकीय जुळवाजुळव सुरू असल्याचे दिसून येत आहे.