राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह टीका केल्याने बीडमध्ये तनुश्रीविरोधात गुन्हा दाखल

0
458

बीड, दि. ४ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. बीडमधील केज पोलीस ठाण्यात मनसे जिल्हाध्यक्षांनी तनुश्री दत्ताविरोधात तक्रार दिली असून अब्रू नुकसानीप्रकरणी तनुश्रीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाना पाटेकर प्रकरणावरुन टीका केली होती. “राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. राज ठाकरे हे गुंड असून नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो”, असे तिने म्हटले होते.

राज ठाकरेंवरील विधानामुळे मनसेचे कार्यकर्ते राज्यभर आक्रमक झाले आहेत. बीडच्या केज पोलीस ठाण्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी तनुश्रीविरोधात तक्रार दिली. तनुश्रीने मुंबईतील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले होते. तनुश्रीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर अब्रूनुकनानी प्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तनुश्रीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मंगळवारी तनुश्री दत्ताच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत लोणावळा येथील मनसे विद्यार्थी सेनेने बिग बॉस या कार्यक्रमाच्या सेटवर जात तनुश्री दत्ताला बिग बॉसमध्ये प्रवेश दिला तर स्टेज उखडून टाकू असा इशारा दिला होता.