राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करतायेत – प्रकाश आंबेडकर

0
1414

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डोकं नाही, ते माझीच कॉपी करत आहेत, राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप मी महिनाभरापूर्वीच केला होता, त्याचीच री राज यांनी ओढली आहे, अशी  टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी विक्रोळीतील सभेत भाजपचा ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव आहे. याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरुन आल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर आंबेडकर यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपने आरक्षण दिले आहे. मराठा समाजाची मते मिळाल्यास भाजपाच्या जागा १७० पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. मात्र, मी त्यांच्या आनंदात खडा टाकू इच्छित नाही, असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.