राज ठाकरेंना ईडीची नोटीस; मनसैनिकाने घेतले जाळून

0
359

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कोहिनुर प्रकरणी नोटीस पाठवली होती. याच कारणामुळे कळव्यातील मनसैनिक प्रविण चौगुले याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री त्याने आत्महत्या केली. दरम्यान, प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जातो.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रविणने त्याच्या काही मित्रांना एक मेसेज पाठवला होता. राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे आपण दुखावलो आहोत. त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मेसेज त्यानं आत्महत्येपूर्वी केला होता. या मेसेजनंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतली. दरम्यान, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील शिवाजी रूग्णालयात नेण्यात आला आहे.

प्रविण हा राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक होता. तसेच तो अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जात होता. त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.