राज ठाकरेंची ईडीसमोर चौकशी, तर मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

0
530

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – कोहिनूर मिल प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीसमोर चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालय, राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून मनसैनिकांना ताब्यात घेतले जात आहे. त्यातच मनसेतील वरच्या फळीतील नेते सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे. संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.