Maharashtra

‘राज कुंद्रानेच आपल्याला पॉर्न क्लिप डिलीट करायला सांगितलं होत’; राज कुंद्राच्या कर्मचाऱ्यांचा खुलासा

By PCB Author

July 27, 2021

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी पोलिसांनी अटक केली. अटक झाल्यानंतर पोलीस सध्या वेगाने तपास करत असून सध्या राज कुंद्राचे चार कर्मचारी या प्रकरणात साक्षीदार झाले असल्याने पोलिसांनी सांगितले. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणी वेगवेगळ्या गोष्टींचा दररोज खुलासा होत आहे.

राज कुंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना महत्वाची माहिती दिली आहे, ज्यामुळे राज कुंद्रासमोर असणारा चौकशी आणि तपासाचा वेढा आणखी आवळला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने आपल्याला पॉर्न क्लिप डिलीट करण्यास सांगितलं होतं असं या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. या क्लिप्स हॉटशॉट्सवरुन अपलोड करण्यात आल्या होत्या. यालाही या कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. राज कुंद्राने ‘हॉटशॉट्स’ याच अॅपच्या माध्यमातून पॉर्नचं स्ट्रिमिंग केलं असा पोलिसांचा संशय आहे. हे अॅप गुगल स्टोअर आणि आयओएसवरुन काढून टाकण्यात आलं आहे.

यानंतर आरोपींनी प्लॅन बी करत ‘Bollyfame’ नावाचं दुसरं अॅप लाँच केलं होतं. राज कुंद्राला पोलिसांनी १९ जुलैला अटक केली आहे. कोर्टाने राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर रेकॉर्डमधून डेटा डिलीट करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर विभागातील एका कर्मचाऱ्याचे सध्या फरार असणाऱ्या यश ठाकूरसोबत संबंध असल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश ठाकूरने आयबीमधील एका अधिकाऱ्यासोबत मैत्री केली होती. जेणेकरुन अॅप सुरु करुन त्यावरुन पॉर्नचं स्ट्रिमिंग करता येईल. अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावे अॅप रजिस्टर केलं होतं असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. यश ठाकूरने अॅपवर पुरस्कारप्राप्त शॉर्ट फिल्म्स प्रदर्शित केल्या जातील असं सांगितलं होतं. पण नंतर जेव्हा यश ठाकूरने पॉर्न क्लिप अपलोड करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने विरोध केला.व्हिडीओमध्ये काहीही आक्षेपार्ह लैंगिक कृत्य नसल्याचं राज कुंद्राने म्हटलं आहे. दरम्यान शिल्पा शेट्टीने पोलिसांना आपण राज कुंद्रा चालवत असलेल्या अॅपमध्ये नेमका कोणता कंटेंट आहे याची कल्पना नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी तिने एरॉटिका आणि पॉर्नोग्राफीत फरक असून आपला पती पॉर्न कंटेटंची निर्मिती करत नव्हता असा दावा केला आहे.

राज कुंद्राच्या वकिलांनीही कंटेंटला पॉर्नोग्राफी म्हणण्यावर आक्षेप घेतला आहे. असाच कंटेंट नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस राज कुंद्राची कसून चौकशी करत असून कार्यालयासोबत त्याच्या घराचीही झडती घेतली जात आहे. राज कुंद्राच्या विरोधात पोलिसांना अनेक पुरावे सापडले आहेत. याशिवाय त्याच्या घरी एक गुप्त कपाटही सापडल्याचं कळत आहे. दरम्यान तपास करण्यासाठी मुंबई पोलीस राज कुंद्राच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी राज कुंद्रालाही सोबत घेतलं होतं. अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राला पाहून शिल्पा शेट्टीचा संताप अनावर झाला आणि पोलिसांसमोरच ती राज कुंद्रावर ओरडू लागली. यावेळी शिल्पा शेट्टीचे अश्रू थांबत नव्हते. “आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती,” असं शिल्पा शेट्टी राज कुंद्राला विचारत होती. पोलिसांनी यावेळी संपूर्ण घराची पाहणी केली. पोलिसांनी यावेळी शिल्पा शेट्टीचा जबाबही नोंदवला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी यावेळी खूप भावूक झाली होती. “तू कुटुंबाची प्रतिष्ठा मलीन केली आहेस. इंडस्ट्रीतील काम हातून गेलं आहे. अनेक प्रोजेक्ट्स हातातून सोडावे लागले आहेत,” अशा शब्दांत तिने राज कुंद्राला ऐकवलं. आपल्याला खूप आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचंही यावेळी शिल्पा शेट्टीने म्हटलं.

दरम्यान राज कुंद्राने यावेळी आपण पॉर्न सिनेमा बनवले नसून इरॉटिक सिनेमा बनवल्याचं स्पष्टीकरण शिल्पाला दिलं. दरम्यान पोलीस शिल्पा शेट्टीने विआन कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा का दिला याचा तपास करत आहेत. तिच्याही आर्थिक व्यवहाराची तपासणी केली जात आहे.या चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीने हॉटशॉट या अ‍ॅपवर नेमका काय कंटेट दाखवला जात होता याची कल्पना नसल्याचं म्हंटलं आहे. अश्लील सिनेमा आणि इरॉटिका हे दोन्ही वेगवेगळे असून राजच्या अ‍ॅपवर इरॉटिका म्हणजेच केवळ उत्तेजीत करणारे सिनेमा असल्याचं ती म्हणाली. तसंच राज कुंद्राचा अश्लील सिनेमाच्या निर्मितीशी संबध नसल्याच शिल्पा म्हणाली आहे.पोलिसांनी आतापर्यंत दोन वेळा शिल्पा शेट्टीची चौकशी केली आहे.पोलिसांना अद्याप शिल्पा शेट्टीचा सहभाग दर्शवणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. कोणत्याही साक्षीदाराने शिल्पा शेट्टीचं नाव घेतलेलं नाही. दुसरीकडे राज कुंद्राने हायकोर्टात धाव घेतली आहे. तर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राज कुंद्राला मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.