राज्य सरकार मराठा आंदोलनकर्त्यांना खेळवत आहे – अजित पवार

0
718

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा केली आहे. प्रत्यक्ष कृती केलेली नाही. गेली चार वर्ष सरकार आंदोलनकर्त्यांना खेळवत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून याठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र, याठिकाणी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.  आरक्षणाच्या मुद्यावरून अधिवेशनात आम्ही पहिल्याच दिवशी आक्रमक होऊ, असा  इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (मंगळवार) येथे दिला.

गेल्या बारा दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात उपोषण  सुरू केले आहे. आज अजित पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चालढकल करत आहे, असा आरोप केला.

मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मुंबईत असतात ते चर्चा करू शकले असते. मात्र हे सरकार असताना या कार्यकर्त्यांनी काळी दिवाळी साजरी केली. याबाबत आम्ही सरकारचा निषेध करतो. आज सहकारमंत्री  सुभाष देशमुख उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले, आम्ही येणार म्हणून मंत्री आले का? हे कळले नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.