राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; फडणवीस, दानवे अमित शहांच्या भेटीला  

0
743

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा कऱण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार  आहेत. यावेळी मंत्रिमंडळ यादी आणि शिवसेनेचा वाटा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, दानवे आणि महामंत्री रामलाल यांच्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनावरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत कमालीची  गोपनीयता बाळगली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे इतर महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत  इतकी गुप्तता का बाळगली, यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार  हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यात शिवसेनेला सोबत ठेवणेही भाजपसमोर आव्हान असेल. त्यादृष्टीने या बैठकीत चर्चा  होण्याची शक्यता आहे.

सध्या भाजप शिवसेनेमधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपच्या एकूण ४ मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा १२ मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील ४ जागा भरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.