राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार; मंत्रिपदाची ‘या’ नेत्यांना लागणार लॉटरी

0
687

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – बहुप्रतिक्षित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (दि.१६) होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून ५ तर शिवसेनेकडून २ मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

भाजपकडून काँग्रेसला रामराम करून कमळ हाती घेणारे राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, आशिष शेलार, अनिल बोंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तर काही जणांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू  केले असून वरीष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे.

तर शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे  आरपीआयला खूश करण्यासाठी एक मंत्रीपद  देण्यात येणार असल्याचे समजते. आरपीआयचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांचे नाव केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निश्चित केले आहे.

दरम्यान,  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन शुक्रवारी रात्री उशीरा भेट घेतली. या भेटीत विस्ताराबाबत चर्चा केली. या चर्चेअंती नव्या विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. फडणवीस यांनी त्याबाबत ट्विटही केले होते.   या विस्तारात सेनेकडे उपमुख्यमंत्रिपद आल्यास त्या पदावर कोणाची वर्णी लागणार, हे पाहावे लागणार आहे.