राज्याला पाणीसंकटाचे चटके बसण्यास सुरूवात

0
390

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – सप्टेंबरसोबतच मान्सूनपर्वही सरले असून ऑक्टोबरमधील उष्म्याच्या तडाख्याबरोबरच राज्याला पाणीसंकटाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. वरुणराजाने पाठ फिरवल्याने यंदा सरासरीच्या ७७.४ टक्केच पाऊस झाला असून महाराष्ट्रातील १६४ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

खरिपाच्या पिकांच्या उत्पादनाला अपुऱ्या पावसाचा फटका बसण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मान्सूनने राज्यातील बहुतांश भागात पाठच फिरवली.  जून, जुलैमध्ये पावसाचा खेळ सुरू राहिला. त्यामुळे राज्यातील खरीपाच्या पेरणीपैकी ९४ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली. त्यातही तृणधान्यांच्या पेरणीत १६ टक्के घट झाली. त्यानंतरही पावसाने पाठ फिरवली. आता अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती कृषी विभागाच्या अहवालात व्यक्त झाली आहे.

अपुऱ्या पावसाचा सर्वात मोठा फटका धरणांमधील पाणीसाठय़ाला बसला असला असून राज्यातील मोठय़ा, मध्यम, लघु प्रकल्पांत मिळून एकूण ६५.३७ टक्केच पाणीसाठा झाला आहे. मागच्या वर्षी हेच प्रमाण ७४.६५ टक्के होते हे लक्षात घेता जवळपास १० टक्क्यांची घट पाणीसाठय़ात झाली आहे. मराठवाडय़ाची परिस्थिती सर्वात भीषण असून पावसाळ्याच्या चार महिन्यांनंतर तेथील प्रकल्पांमध्ये २७.७३ टक्के पाणीच जमा झाले आहे. मागच्या वर्षी हेच प्रमाण ६५.१९ टक्के होते हे लक्षात घेता भविष्यातील भीषण परिस्थितीचा अंदाज येतो. कोकणातील ९०.२५ टक्के वगळता एकाही महसुली विभागात ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नाही. मराठवाडय़ापाठोपाठ नागपूर विभागात ५०.२६ टक्के तर अमरावती विभागात ५८.१३ टक्के पाणीसाठा आहे. नाशिक विभागात ६४.९२ टक्के तर पुणे विभागात ८४.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.  राज्यातील सर्वाधिक १८२ टॅंकर मराठवाडय़ात सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ात १५८ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. उत्तर महाराष्ट्रात ११८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यातही नाशिक जिल्ह्य़ात ५३ तर नगर जिल्ह्य़ात ४५ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.