राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल – संजय राऊत 

0
621

मुंबई, दि. २० (पीसीबी) – २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या होत्या. पण तरी देखील २०१९ मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये समान जागा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आम्हीच मोठा भाऊ असून सत्ता आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा पुनरूच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलत होते. राऊत पुढे म्हणाले की, राज्यात भाजप कधीही शिवसेनेची जागा घेऊ शकत नाही.  सध्याची भाजप ही आधीसारखी  नसून भाजपमधील अर्ध्याहून अधिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आले आहेत. त्यांना पक्षात घेतले म्हणजे शिवसेनेची जागा मिळवता येईल, असे होत  नाही.

तुम्ही शिवसेनेची जागा घ्यालही, पण शिवसेनेसारखी मर्दानी हिंमतीची छाती कुठून आणणार, असा सवाल करून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षाची टर्म पूर्ण करणार का, या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर देण्याचे टाळले.