‘राज्यात भाजपचे सरकार येणार; फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार’

0
443

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, ‘राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले. या बरोबरच ‘देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.

भाजप शिवसेना युतीसंदर्भात कोणतेही भाष्य न करता आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना त्यांनी मुख्यमत्र्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर कायम ठेवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात गुंतवणूक, शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला पुढे आणले, असे म्हणत शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस हाच राज्यातील भाजपचा चेहरा असल्याचे अधोरेखित केले.