राज्यात भाजपचा गोपनीय सर्व्हे; ६ खासदार, ५० आमदार डेंजर झोनमध्ये!

0
2546

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ यामुळे मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारवर जनतेमधून असंतोष वाढत असताना राज्यातील भाजप सरकारने दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून केलेल्या गोपनीय सर्व्हेत भाजपचे राज्यातील ६ खासदार आणि जवळपास ५० आमदार डेंजर झोनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व्हेत भाजपच्या १२१ आमदारांपैकी ४० टक्के आमदारांची कामगिरी खूपच सुमार दर्जाची असल्याचे म्हटले आहे.

या सर्व्हेत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची कामगिरी खूपच सुमारअसल्याचे  म्हटले आहे. त्यांना केवळ १९ टक्के पसंती मिळाली आहे. तर राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे यांचीही कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदार-खासदारांना बंद लिफाप्यात या सर्व्हेचा अहवाल दिला आहे. घरी जाऊन लिफाफा उघडा आणि कार्ड बघा, अशा सूचना  मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच या सर्व्हेबद्दल मीडियासमोर अवाक्षरही काढू नका, अशी सक्त सुचनाही   दिल्या आहेत.

ज्या खासदारांना केवळ १९ टक्क्यांपर्यंत पसंती मिळाली आहे, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. सध्याच्या भाजपच्या २१ खासदारांपैकी ६ खासदांचे तिकीट २०१९ मध्ये कापण्याची शक्यता  आहे. जळगावच्या खासदार रक्षा खडसे, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर सुमारे ६० टक्के मतदारांनी विद्यमान आमदार-खासदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे.