राज्यात परतीच्या पावसाचा जोर; मुंबई पुण्यात सतर्कतेचा इशारा

0
660

पुणे, दि. ४ (पीसीबी) – काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. तसेच ऐन गणेशोत्सवामध्ये पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमधील सणाचा उत्साह कमी झाल्याचे दिसते.

राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.

मध्य, वेस्टर्न आणि हार्बर रेल्वे दहा ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील २४ तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. राधानगरी धरणाच्या सहा नंबरच्या दरवाजातून १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर मुख्य दरवाजातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणं पुन्हा तुडुंब भरून वाहू लागली आहेत. त्यामुळं धरणांमधुन पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग सत्तावीस हजार क्युसेक्स वेगाने वाढवण्यात आला आहे.