राज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे

0
1404

राजगुरूनगर, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमच्यावर टीका करतात. मात्र , त्यांनी आधी काका शरद पवार यांचा राफेलला पाठिंबा आहे की नाही, याबाबत विचारावे. तसेच तुम्हाला एक विंनती करतो की, राज्यात दुष्काळ पडला आहे, त्यामुळे अजित पवारांना धरणांच्या जवळही अजिबात  फिरकू देऊ नका, असा उपरोधिक टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अजित पवारांना लगावला.

खेड येथे जाहीर सभेत उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही तोफ डागली. गडकरी बरा माणूस आहे. त्यांनी पूर्णपणे खात्री नव्हती की, आपले सरकार येणार नाही. मात्र, आम्हाला ठाम विश्वास आहे की, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी २०१९मध्ये शिवसेनेचे सरकार येणार आहे. खोटे बोलून आम्ही एक मत मागणार नाही. गडकरींचे विधान म्हणजे निर्लज्जपणा आणि कोडगेपणा असल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आधी वडिलांचे स्मारक बांधावे. तरच ते राम मंदिर बांधतील, याची खात्री लोकांना पटेल, अशी खोचक टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे.  पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन  करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, आगामी निवडणुकां डोळ्यासमोर राम मंदिराचे राजकारण  केले जात आहे. गेली  चार वर्षे शिवसेनेला या विषयावर बोलण्यास कोणी  रोखले होते का?