राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी १५ मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध मराठा थेट लढती

0
644

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी १५ मतदारसंघांत मराठा विरुद्ध मराठा, तर एका जागी कुणबी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत असल्याने यंदाच्या निवडणुकीत ‘मराठा फॅक्टर’ कितपत प्रभावी ठरेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. २ वर्षांपूर्वी मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून राजकीय भूमिका आणि पक्षभेद विसरून एक झालेला मराठा समाज यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पुन्हा एकदा विविध गटांमध्ये विभागला गेला आहे. त्यातही लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकांमध्येही ठोस राजकीय भूमिका निश्चित न झाल्याने तूर्तास तरी मराठा समाजाचा कल स्पष्ट होऊ शकलेला नाही.

दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ५० पेक्षा अधिक मूक मोर्चांचे शिस्तबद्ध आयोजन करून एका मोठ्या ‘राजकीय शक्ती’च्या रूपात मराठा समाज नव्याने राजकीय क्षितिजावर अवतरला होता. मराठा समाजाच्या या रेट्यापुढे नमते घेत राज्य सरकारनेही मोर्चेकऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या तत्त्वत: मान्य केल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘मराठा फॅक्टर’ एकगठ्ठा प्रभावी ठरेल असा अंदाज त्या वेळी व्यक्त केला जात होता. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता मराठा समाज कुणा एका पक्षाच्या पाठीशी एकगठ्ठा उभा असल्याचे दिसत नाही.

४२ मराठा, तर ६ कुणबी उमेदवार

अपक्षांसह सर्वपक्षीय उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर मराठा समाजाच्या उमेदवारांची एकूण संख्या ४२ आहे. मराठा समाजाची पोटजात मानल्या जाणाऱ्या कुणबी समाजाचे ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

काँग्रेस महाआघाडीने १६ मराठा व ५ कुणबी, तर भाजप-सेनेच्या महायुतीने २३ मराठा व एका कुणबी उमेदवाराला तिकीट दिले आहे. याशिवाय अहमदनगरमधून संजीव भोर, औरंगाबादमधून हर्षवर्धन जाधव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नीलेश राणे हे ३ मराठा उमेदवार रिंगणात आहेत.

१५ मतदारसंघांत मराठा विरुद्ध मराठा आणि एका मतदारसंघात कुणबी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत असणार आहे. त्यामुळे मराठा मतांची विभागणी होणे अटळ आहे. ही बाब लक्षात घेता या निवडणुकीत तरी मराठा फॅक्टर एकगठ्ठा प्रभावी ठरण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते.