राज्यातील लोककलावंतांना मदत करा – नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0
551

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – कोरोनामुळे गावखेड्यासह शहरातील लोककलावंतांची मोठी उपेक्षा होत असून त्यांची उपासमार सुरू असल्याने त्यांना तत्काळ मदत करा, अशी कळकळीची विनंती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात भोईर यांनी या कलावंतांची किती दैन्यावस्था सुरू आहे, त्याचे वास्तव चित्र मांडले आहे. पत्रात ते म्हणतात, सांस्कृतिक भूक भागवणारा कलावंत हा एक मुख्य घटक आज उपेक्षित आहे. कलाकारांसमोर भयावह परिस्थिती उभी ठेपली आहे. कारण व्यावसायिक कलावंत मोजकेच असतात. खेड्यामध्ये साहित्य रूपाने, लोक कलावंत, चित्रपट सुष्टीतील कलावंत, नाट्य क्षेत्रातील कलावंत, मेकअप मन, शाहीर या सर्व क्षेत्रातील कलावंतांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ३ महिन्यामध्ये त्यांची सर्वच कला बंद पडलेली आहे. त्यांना कोणत्याही स्वरूपाचा आधार नाही. कुटुंबांची उपजीविका कशी चलवायची हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

एका नाटकाचे जर १५ ते २० प्रयोग झाले तर बॅक स्टेज कलाकार, मेकअप मॅन, सेट उभा करणारे अशा सर्वांचे संसार चालतात. आज चित्र भयंकर आहे. नाटकांचे प्रयोग बंद पडल्याने सर्व कलावंतांची उपासमार सुरू आहबे. आज ते लोक फोनच्या माध्यमातून संपर्क करत असतात. कर्तव्य व माणुसकीच्या भावनेतून आम्ही वैयक्तिक व तात्पुरती मदत करत असतो, पण त्याला खूप मर्यादा आहेत. सरकारने आदेश दिला तर राज्यपातळीवर जिल्हाअधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, हे सर्व कलावंतांना किमान धान्य, किराणा कसे मिळेल यासाठी मदत करू शकतील. त्यासाठी सरकारने पावले उचलावीत. हाच घटक दुर्लक्षित होत आहे. शेतकरी जे कर्जामध्ये बुडल्यानंतर आत्महत्यांच प्रमाण मधल्या कालखंडा वाढले होते, त्याच प्रमाणे कलाकारासमोर प्रश्न उभा राहिला आहे. कलाकारांच्या संदर्भात आपल्याला देखील निश्चित पणे जाण आहे. मदतीचा जो भाग आहे तो अत्यंत तातडीने करणे आवश्यक आहे, असेही भोईर यांनी पत्रात म्हटले आहे.

जिल्हा पातळीवर या सर्व कलावंतांच्या याद्या उपलब्ध आहेत. चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, महाराष्ट्र शाहीर परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या माध्यमातून या कलावंतांच्या याद्या उपलब्ध आहेत. नाट्य परिषेदेच्या जवळजवळ दीडशेहून अधिक शाखा आहेत. या सर्व शाखा क्षेत्रातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा मंडळींना मदत मिळाली पाहिजे. भेदभाव न करता कलावंतांना मदत पोहोचणे अत्यंत महत्वाचे आहे, असे भोईर यांनी सुचविले आहे.

नाट्य संमेलन हे जवळपास रद्द झालेलं आहे. त्यासाठी सुमारे ५ ते १० कोटींचा खर्च होता. महाराष्ट्र भूषण सारखे पुरस्काराचे सोहळ्याचा खर्च वाचवून तो निधी वर्ग करून या कलावंतासाठी वापरावा, अशी विंनती भोईर यांनी केली आहे.