राज्यातील पहिली भन्नाट बैलगाडा शर्यत शिवाजीराव आढाळराव यांच्या गावात

0
871

पुणे, दि. २६ (पीसीबी) : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंद उठवल्यानंतर राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यातीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील लांडेवाडीत बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, या शर्यतीला प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेत पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असल्याचे निश्चित झाले आहे.

1 जानेवारीला बैलगाडा शर्यत –
यंदा नववर्षाची सुरूवातच जंगी होणार आहे, कारण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला ही शर्यत होणार आहे. आंबेगावमधील लांडेवाडीत दरवर्षी शितळादेवीची यात्रा भरते, या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण गावातील दत्तजयंती उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली आहे. 7 ते 8 वर्षानंतर गावातील बैलगाडा शर्यत पार पडणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बैलगाडा शर्यत ही एक परंपरा मानली जाते, त्याचबरोबर बैलगाडा शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून वारंवार बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
बैलगाडा शर्यतीत हे नियम पाळावे लागणार

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे देखील बंधनकारक असणार आहे. बैलगाडा शर्यतीत बैलांना इलेक्ट्रीक शॉक देणे, त्यांना बेदम मारहाण करणे असे प्रकार सर्सास होत असल्यानेच कोर्टाने शर्यतीवर बंदी घातली होती, असा कुठलाही प्रकार पुन्हा घडू नये असे आदेश न्यायलयाकडून देण्यात आले आहेत, मोठ्या प्रयत्नानंतर सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली आहे, त्यामुळे हेही नियम शर्यतीत पाळावे लागणार आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे, कारण राज्यात सध्या ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लावले जात आहेत. अशातच या शर्यती पार पडत असल्याने कोरोना नियमांचे भान राखावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.