राज्यातल्या महाविद्यालयाच्या निवडणुका लांबणीवर; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

0
430

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार होत्या. या निवडणुकांबाबत विविध विद्यापीठांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार निवडणुका सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६  मधील कलम ९९ (११) (क) मध्ये बदलाबाबतची अधिसूचना व आदेश निर्गमित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणूक ऑगस्ट महिन्यात आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले.

मात्र, या काळामध्ये विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवर ताण येणार असल्याने काही मुद्दे पोलीस आणि प्रशासनाकडून उपस्थित केले गेले होते. यामुळे राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.