Banner News

राज्याचे दरडोई उत्पन्न वाढले; किमया फडणवीस सरकारच्या ‘3D’ मॉडेलची !

By PCB Author

July 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  ‘सर्वांसाठी न्याय्य संधी आणि विकास निर्माण करणे’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली होती. या दरम्यान त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम केले. या पाच वर्षात त्यांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना यश मिळाल्याचे आता समोर येत आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू व मध्य प्रदेश या राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील  दरडोई उत्पन्न अधिक आहे. 

ही मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पारदर्शी’ आणि गतिमान कामाचीच पावती आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या पाच वर्षात देवेंद्रजींनी विकासाचे जे मॉडेल राबवले, त्याचे वर्णन राज्यशास्त्र व अर्थशास्त्रातील मंडळी #Devendra Development Doctrine  या शब्दांत करत आहेत. सध्या देवेंद्रजींच्या या आगळ्या-वेगळ्या ‘3D’ मॉडेलची सर्वत्र चर्चा आहे.

सन २०१६-१७ मध्ये दरडोई राज्य उत्पन्न १ लाख ६२ हजार ५  होते. २०१७-१८ मध्ये ते वाढून १ लाख ७६ हजार १०२ झाले आहे.  यावर्षी दरडोई उत्पन्न एक लाख ९१ हजार ८२७ रुपये होईल, असे अपेक्षित असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

याशिवाय आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील २.७८ कोटी शिधापत्रिकांपैकी २.४२ कोटी शिधापत्रिकांचे संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे बोगस शिधापत्रिकांना यापुढे आळा बसणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत अडीच कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. ज्यामुळे आर्थिक व्यवहार ‘पारदर्शक’ होण्यास खूप मोठी मदत होणार आहे.

सन २०१८-१९ मध्ये राज्यात ८० हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी राज्यात उपलब्ध होणार आहेत. एकूणच राज्याचे दरडोई उत्पन्न वाढल्याने फडणवीस सरकारच्या मानात आणखी एक शिरपेच रोवला गेला आहे.  आर्थिक पाहणी अहवालामधील वरील सर्व आकडेवारी, सोशल मीडियावर फडणवीस सरकारच्या विरोधात अफवा पसरवणाऱ्यांसाठी एक सणसणीत चपराक आहे, हे मात्र नक्की !